औरंगाबाद: तीन महिन्यापूर्वी मनपा प्रशासनाच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेतून शहरात स्मार्ट सिटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ३६ बसेस शहरात सुरू असून, आणखी ४१ नवीन बसेस शहरात दाखल झाल्या असल्याचे एस.टी.चे विभागिय नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी सांगितले.
मनपा प्रशासनाच्या वतीने स्मार्ट सिटीयोजनेतून शहरात स्मार्ट सिटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी २३ जानेवारी रोजी या बसेसचे लोकार्पण युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत १०० सिटी बस शहरात चालवण्यात येणार आहेत. शहरात टप्प्याटप्प्याने आज घडीला २१ मार्गावर ३६ बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बस चालविण्याकरिता ८५ वाहक-चालक देण्यात आलेले आहे. आणखी ४१ नवीन सिटीबसेस शहरात दाखल झाल्या असल्याचे भुसारी यांनी सांगितले. पासिंग करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने या बसेस शहरात धावणार आहेत . यातील पहिल्या टप्प्यात 16 बसेस शहरात धावतील. त्यानंतर उर्वरित बसेस विविध टप्प्यात धावताना दिसणार आहेत. या संपूर्ण बसेस शहरात धावायला सुरुवात झाल्यानंतर विविध मार्गावर धावणाऱ्या बसच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यल्प दरात चांगली सुविधा उपलब्ध होईल.